कमी दर्जाच्या तांदळाच्या प्रयोगशाळा तपासणीचे निर्देश

कमी दर्जाच्या तांदळाच्या प्रयोगशाळा तपासणीचे निर्देश

केंद्रीय तपासणी पथकाच्या तपासणीत ठरवून दिलेल्या मानकांपेक्षा कमी दर्जाचा तांदूळ (BRL) आढळून आला होता. या तांदळाची प्रयोगशाळा तपासणी करून वापराबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.

अन्न व नागरी पुरवठा विभागाची आढावा बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. यावेळी श्री. भुजबळ बोलत होते. बैठकीस प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, शिधा वाटप नियंत्रक सुधाकर तेलंग उपस्थित होते.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, संबंधित गिरणीधारकांनी (राईस मिलधारकांनी) कमी दर्जाचा तांदूळ बदलून देणे अपेक्षित होते. मात्र, ही जबाबदारी न पाळल्यामुळे अशा गिरणीधारकांना राज्य शासनाने काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही प्रस्तावित केली होती. या कार्यवाहीविरोधात संबंधित राईस मिलधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्या असून, विभागाने न्यायालयास आवश्यक माहिती सादर करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

केंद्रीय पथकाच्या नियमित तपासणी अंतर्गत पुणे व नागपूर विभागातील ९ जिल्ह्यांतील राज्य शासनाची गोदामे, धान्य भरडाई गिरण्या आणि स्वस्त धान्य दुकाने तपासण्यात आली. या तपासणीत एकूण २३१ नमुने (२२६ तांदळाचे व ५ गव्हाचे) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अशी माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाच्या अधिकारी – कर्मचारी संघटनांच्या मागण्याबाबतही माहिती घेतली. यात अधिकारी – कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, पदोन्नती तसेच व्यपगत पदे या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *