कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्नाक पुलाचे ‘सिंदूर’ नामकरण केल्याने इतिहासाच्या काळ्या खुणा पुसल्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारतीयांना फसविणारा आणि अत्याचार करणारा अशी ओळख असेलेल्या कर्नाक या ब्रिटीश गव्हर्नरच्या नावाने मुंबईत स्थित दिडशे वर्षांपासूनच्या इतिहासाच्या काळ्या खुणा पुसत कर्नाक पुलाचे नामकरण ‘सिंदूर’ केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील व पी. डी’मेलो मार्गाला जोडणाऱ्या या सिंदूर (पूर्वीचा कर्नाक पूल) रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्‍यमंत्री फडणवीस यांच्‍या हस्‍ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार मनीषा कायंदे, माजी आमदार राज पुरोहित, बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात इतिहासातील काळी प्रकरणे संपली पाहिजेत, त्याच्या खुणा मिटल्या पाहिजेत असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याने कर्नाक पुलाचे नाव बदलले. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारत पाकिस्तानात घुसून दहशदवादी अड्डे उद्धवस्त करू शकतो, हे दाखवून दिले. या सेनेच्या अतुलनीय कामगिरीमुळे सर्वांच्या मते महापालिकेने पुलाला ‘सिंदूर’ नाव दिले, याचा मला आनंद आहे. या पुलाची एकूण लांबी 342 मीटर असून रेल्वेच्या हद्दीत 70 मीटर इतकी असल्याने निश्चितच मुंबईतल्या वाहतुकीसाठी पूल अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *