मध्यप्रदेशातील शाजापूर जिल्ह्यामधील लिंबूवर्गीय फळ उत्पादकांसाठी १५-१७ जुलै दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अधिन असणाऱ्या नागपूर येथील अमरावती रोड स्थित-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था नागपूरतर्फे तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण २७ लिंबूवर्गीय फळ उत्पादक सहभागी झाले. हा प्रशिक्षण कार्यक्रम कृषी आणि प्रक्रिया केलेले खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण – अपेडा प्रायोजित प्रकल्प “लिंबूवर्गीय शेतकऱ्यांसाठी चांगल्या कृषी पद्धतींचा अवलंब : क्षमता विकास कार्यक्रम” अंतर्गत आयोजित करण्यात आला होता. आयसीएआर-सीसीआरआय, नागपूरचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी प्रास्ताविक केले आणि रोगमुक्त लागवड साहित्याच्या उत्पादनासंबंधी संस्थेच्या तंत्रज्ञानावर प्रकाश टाकला. डॉ. घोष यांनी शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय फळ लागवडीसाठी शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब करण्यास आणि लिंबूवर्गीय फळ बागांमध्ये आंतरपीके टाळण्यास सांगितले. यामुळे झाडांवर योग्य ताण पडेल आणि वेळेवर फुले येतील.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, कृषी वैज्ञानिक निवड मंडळ नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष प्रा. सी. डी. मायी होते. त्यांनी प्रशिक्षणार्थींना सरकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी समूह (क्लस्टर) तयार करण्याचे आवाहन केले. सन्माननीय अतिथी, डॉ. मुकेश सिंग, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, शाजापूर यांनी शेतकऱ्यांना ३ दिवसांच्या अभ्यासक्रमात लिंबूवर्गीय फळ पीकांच्या सर्व पैलूंबद्दल जाणून घेण्याचे आवाहन केले.
तांत्रिक सत्रांमध्ये आयसीएआर-सीसीआरआयच्या शास्त्रज्ञांनी लिंबूवर्गीय फळांच्या लागवडीसंबंधी विविध महत्त्वाच्या पैलूंवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. दर्शन कदम यांनी लिंबूवर्गीय फळबागांची स्थापना आणि व्यवस्थापन, डॉ. ए. थिरुज्ञानावेल यांनी रोपवाटिका स्थापना, डॉ. सुरजित मोंडल यांनी लिंबूवर्गीय फळांचे पोषण व्यवस्थापन, डॉ. ए. के. दास यांनी लिंबूवर्गीय फळांचे रोग व्यवस्थापन, डॉ. एन. एम. मेश्राम यांनी कीटक व्यवस्थापन, डॉ. के. के. कोम्मू यांनी लिंबूवर्गीय फळबागांमधील नेमाटोड व्यवस्थापन, डॉ. वेंकटरामन बनसोडे यांनी लिंबूवर्गीय फळांच्या तोडणीनंतरच्या व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले आणि लिंबूवर्गीय फळांच्या पॅकिंग लाइनचे प्रात्यक्षिक दाखवले. डॉ. संगीता भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय फळ बागांचा ऱ्हास आणि संबंधित पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाबद्दल जागरूक केले. डॉ. जे. पी. तेजकुमार यांनी वनस्पती प्रजाती आणि शेतकरी अधिकार प्राधिकरण च्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून झाडांच्या जातींचे संरक्षण करण्याबाबत शेतकऱ्यांना जागरूक केले. डॉ. यू. आर. सांगळे आणि डॉ. अशोक कुमार यांनी बोर्डो मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले.