मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !’आंबट शौकीन’मधील निखिल वैरागर – अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र

मराठी सिनेसृष्टीला मिळाली नवीन जोडी !’आंबट शौकीन’मधील निखिल वैरागर – अक्षय टंकसाळे पुन्हा एकत्र

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नव्या संकल्पना, नव्या चेहऱ्यांना, नव्या जोडीला संधी मिळत असून प्रेक्षकही त्यांचं भरभरून स्वागत करत आहेत. आता अशाच नव्या आणि टॅलेंटेड जोडीचा प्रवेश मराठी सिनेमात होत आहे. ही जोडी म्हणजे निखिल वैरागर आणि अक्षय टंकसाळे. या दोघांचा ‘आंबट शौकीन’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी आपल्या नव्या दृष्टिकोनासह मराठी सिनेमात नवा श्वास घेऊन येत आहे.

या दोघांची केमिस्ट्री याआधी ‘गॅटमॅट’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांनी पाहिलीच आहे. यावेळी ते सहकलाकार होते, तसेच निखिलने लेखकाची धुरा सांभाळली होती.  मात्र ‘आंबट शौकीन’मध्ये निखिल – अक्षय अभिनयासोबतच दिग्दर्शक- लेखक म्हणूनही समोर येणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांनी एक विनोदी, तरीही सामाजिक संदेश देणारी कथा रंगवली असून, प्रेक्षकांना मनोरंजनाचा आणि विचारांचा दुहेरी अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे.

‘आंबट शौकीन’च्या निर्मितीनंतर निखिल आणि अक्षय यांच्यावर आता संपूर्ण इंडस्ट्रीचे लक्ष लागले आहे. येत्या काळात ही जोडी काही नवे प्रोजेक्ट्स घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

निखिल वैरागर म्हणतो, ”आंबट शौकीन’ हा आमच्यासाठी केवळ चित्रपट नाही, तर आमचा आत्मविश्वास आणि आमचे अनुभव यांचं संकलन आहे. आम्हाला दोघांनाही वेगळं काहीतरी करायचं होतं आणि प्रेक्षकांसाठी ताज्या वाटा शोधायच्या होत्या. हा सिनेमा करताना आम्ही सतत विचार केला की, प्रेक्षक हसतील, त्याच वेळी अंतर्मुखही होतील आणि त्यातूनच ‘आंबट शौकीन’ची निर्मिती झाली.”

तर अक्षय टंकसाळे म्हणतो, ” निखिल आणि मी याआधी एकत्र काम केल्याने त्याच्या कामाची पद्धत मला माहित आहे आणि त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम करू शकलो. आजच्या  तरुण पिढीला आणि कुटुंबवत्सल प्रेक्षकांना एका हलक्याफुलक्या माध्यमातून काहीतरी सांगता येईल का, हा प्रश्न आम्हाला पडला होता. आणि त्यातून ‘आंबट शौकीन’ जन्माला आला. आम्हाला आमच्या सिनेमात संपूर्ण टीमवर खूप विश्वास होता. आता प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणं हेच आमचं खऱ्या अर्थाने यश असेल.”

हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन व कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात पूजा सावंत, अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर, किरण गायकवाड, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत आणि राहुल मगदूम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *