वातावरण बदलामुळे होणारी हानी पर्यावरण संवर्धनातून निश्चितच टाळता येणार आहे. पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू प्लास्टिक असून ‘सिंगल यूज प्लास्टिक’ वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावर्षी शासनाच्यावतीने १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भामला फाऊंडेशन आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वांद्रे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वातावरण बदलावर जागतिक प्रचार मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अँम्फी थिएटर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमास गोवा राज्याचे परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो, मुंबई महापालिका सहआयुक्त दिनेश पल्लेवाड, भामला फाउंडेशनचे आसिफ भामला, अभिनेत्री रवीना टंडन, गोदरेज कंपनीचे नादिर गोदरेज, गीतकार स्वानंद किरकिरे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कमीत कमी प्लास्टिक वापरून पर्यावरणाची होणारी हानी टाळावी. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहकार्याने विघटनकारी प्लास्टिक निर्माण करणे शक्य आहे. प्लास्टिकला पर्याय अशा विघटनकारी प्लास्टिक निर्मिती करावी. राज्यात राबविण्यात येणाऱ्या वृक्षलागवड मोहिमेत केवळ वृक्ष लागवड करण्यात येणार नसून वृक्ष जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. या मोहिमेत वृक्षांचे संवर्धनही करण्यात येईल.