भारतीय तटरक्षक दलासाठी पुढच्या पिढीतील सहा अपतटीय गस्ती जहाजांपैकी, यार्ड 16401 या पहिल्या, जहाजाचा कील-लेईंग अर्थात जहाज बांधणीचा प्रारंभ समारंभ आज दि. 22 जुलै 2025 रोजी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड इथे झाला. हे जहाज 117 मीटर लांबीचे असून, या जहाजाचा पल्ला 5,000 सागरी मैल असेल. या जहाजावर 11 अधिकारी आणि 110 कर्मचारी राहू शकतील इतकी त्याची क्षमता असेल, हे जहाज कमाल 23 सागरी मैल प्रतितास इतका वेग गाठू शकते. यासोबतच ही जहाजे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित व्यवस्था, रिमोट पायलटेड ड्रोन्स, इंटिग्रेटेड ब्रिज सिस्टिम अर्थात जहाजावरील सर्व प्रणाल्यांची एकात्मिक व्यवस्था आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टिम अर्थात संपूर्ण कार्यान्वयाची एकात्मिक व्यवस्था यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज अणार आहेत.
भारतीय तटरक्षक दलाच्या प्रादेशिक मुख्यालयाचे (उत्तर पश्चिम) चीफ स्टाफ ऑफिसर (तंत्रज्ञान) उपमहानिरीक्षक जनरल आर. एच. नांदोडकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे कार्यकारी संचालक (जहाजबांधणी) ए. विनोद आणि भारतीय तटरक्षक दल तसेच माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. या पुढच्या पिढीतील अपतटीय गस्ती जहाज (NGOPVs) बांधणीचे काम, 20 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या करारानुसार सुरू झाले आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारतच्या धोरणाला अनुसरून ही सर्व जहाजे Buy (Indian-IDDM) अर्थात खरेदीसाठी (स्वदेशी संरचनात्मक आरेखन, विकसित आणि उत्पादित केलेले) या श्रेणीअंतर्गत पूर्णतः स्वदेशी असणार आहेत.