‘राणी’ उलगडणार स्त्रियांच्या स्वत्वाची नवी ओळख‘परिणती – बदल स्वतःसाठी’ मधील पहिले गाणे प्रदर्शित

‘राणी’ उलगडणार स्त्रियांच्या स्वत्वाची नवी ओळख‘परिणती – बदल स्वतःसाठी’ मधील पहिले गाणे प्रदर्शित

दोन सशक्त आणि आत्मनिर्भर स्त्रियांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या मैत्रीचा भावनिक प्रवास मांडणाऱ्या ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ या चित्रपटातील पहिले गाणं ‘राणी’ नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं असून, ते प्रेक्षकांच्या मनाला भिडताना दिसतंय. हे गाणं केवळ मैत्रीचं नसून स्त्रियांच्या स्वशोधाचा सुरेल आविष्कार आहे. सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या जबरदस्त अभिनयामुळे आणि सशक्त स्क्रीन प्रेझेन्समुळे या गाण्याला एक वेगळीच ऊर्जा लाभली आहे.

संगीतकार समीर साप्तीस्कर यांनी दिलेल्या जबरदस्त चालीवर समीर सामंत यांचे अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी बोल सजले आहेत. वैशाली माडे आणि प्राजक्ता शुक्रे यांच्या दमदार गायकीने हे गाणं अजूनच उठावदार झालं आहे. ‘राणी’ हे गाणं एक पेपी ट्रॅक असलं तरी त्यामागे स्वतःसाठी जगण्याची आणि स्वत्व टिकवण्याची प्रेरणा देणारा एक सखोल भावनिक थर आहे.

या गाण्याबद्दल लेखक व दिग्दर्शक अक्षय बाळसराफ म्हणतात, ” ‘राणी’ हे गाणं म्हणजे दोन स्त्रियांच्या नात्याचं आणि त्यांच्या आत्मशक्तीच्या जागृतीचं प्रतीक आहे. एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे, ज्यात स्त्रिया स्वतःसाठी उभ्या राहतात, स्वतःचं अस्तित्व शोधतात आणि त्याचा अभिमान बाळगतात. सोनाली आणि अमृतासारख्या ताकदवान अभिनेत्रींच्या माध्यमातून ही भावना जिवंत झाली आहे. आम्ही हे गाणं केवळ ऐकावं असं नाही, तर अनुभवावं अशी रचना केली आहे. कारण ही प्रत्येक स्त्रीच्या अंतःकरणातून उमटणारी ओळख आहे.”

पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित या चित्रपटाचे निर्माते पराग मेहता आणि हर्ष नरूला असून, अमित डोगरा, मोना नरूला, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन हे सहनिर्माते म्हणून सहभागी आहेत. अक्षय बाळसराफ यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा चित्रपट एक भावनिक आणि प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *