मुंबई शहराच्या गतीला साथ देणारी लोकल ट्रेन ही केवळ प्रवासाचं साधन नसून, अनेकांच्या आयुष्याची साक्षीदार असते. याच लोकलमध्ये सुरू झालेल्या एका नजरेच्या क्षणात जन्माला आलेल्या प्रेमकथेचा सुरेख वेध घेणारा “मुंबई लोकल” हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमिअर शो मुंबईत जल्लोषात पार पडला. यावेळी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबत मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
‘मुंबई लोकल’ या चित्रपटातून प्रेक्षकांना केवळ एक प्रेमकथा नव्हे, तर शहरातल्या गोंगाटात, गर्दीत, थकव्याच्या क्षणांमध्ये नकळत रुजणाऱ्या भावनांची झलक मिळणार आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिजीत यांनी केलं असून, त्यांनी मुंबईच्या धावपळीच्या पार्श्वभूमीवर तयार केलेली ही कथा अतिशय वास्तवदर्शी आणि हृदयस्पर्शी आहे. बिग ब्रेन प्रॉडक्शन्स, आनंदी एंटरटेनमेंट आणि स्प्लेंडिड प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमाने तयार झालेला हा चित्रपट निलेश राठी, प्राची राऊत, सचिन अग्रवाल आणि तन्वी माहेश्वरी यांनी निर्मित केला असून त्र्यंबक डागा हे सहनिर्माते आहेत.
चित्रपटात प्रथमेश परब आणि ज्ञानदा रामतीर्थकर ही जोडी प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहे. ही जोडी लोकलच्या गर्दीत नकळत होणाऱ्या नजरेच्या आदानप्रदानापासून सुरू होणाऱ्या एका भावनिक प्रवासाची अनुभूती प्रेक्षकांना देईल. त्यांच्या अभिनयातली सच्चाई आणि सहजता ही या कथेला एका वेगळ्याच उंचीवर नेते. चित्रपटाच्या प्रीमिअरला भव्य उपस्थिती लाभली. कलाकारांमध्ये भाग्यश्री मोटे, अश्विनी कुलकर्णी, पृथ्वीक प्रताप, मन्मीत पेम, वनीता खरात, संजय खापरे आणि अनिकेत केळकर यांचाही समावेश होता.
मुंबई शहराच्या हृदयात धडकणाऱ्या या चित्रपटाचं प्रदर्शन १ ऑगस्ट रोजी होणार असून, मुंबईतील अनगिनत अनाम प्रेमकथांची ही एक प्रतिनिधी कथा प्रेक्षकांच्या मनात घर करून जाईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.