नाफा मराठी चित्रपट महोत्सव उत्सवी वातावरणात संपन्न!

नाफा मराठी चित्रपट महोत्सव उत्सवी वातावरणात संपन्न!

सॅन होजे,(प्रतिनिधी) : संपूर्ण अमेरिका आणि कॅनडा मधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल २०२५ कमालीचा यशस्वी झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, नाफाचे संस्थापक – अध्यक्ष अभिजीत घोलप यांनी व्यक्त केले.

पहिल्या दिवशी भव्य ग्लॅमरस रेड कार्पेटच्या साथीने फिल्म अवार्ड नाईट रंगली. महाराष्ट्रातून आलेल्या कलावंतांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आणि त्यासोबत अत्यंत मानाचा “नाफा जीवन गौरव” पुरस्कार जेष्ठ अभिनेते अमोल पालकरांना देण्यात आला. दुसऱ्या दिवशी मुख्य चित्रपट महोत्सव सुरु झाला तो अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वैशिट्यपूर्ण भाषणाने. त्यांचं हे भाषण विशेष गाजलं. मराठी चित्रपटसृष्टीची सध्याची अवस्था अशी का आहे? मराठी चित्रपटांबद्दल का ओरड सुरु आहे? मराठी चित्रपट चालत नाहीत याला कोण जबाबदार आहे, अशा प्रश्नांचा वेध घेताना त्यांनी रोखठोक मतं परखडपणे मांडली. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट न चालण्याची कारणं त्यांनी आकडेवारीसह मांडली. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी ‘नाफा’ सारखी संस्था कसा पुढाकार घेऊ शकते, नेमकं काय काम होणं गरजेचं आहे, याबद्दलही ते सविस्तर बोलले.

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘स्नोफ्लॉवर’ या चित्रपटांचं स्क्रिनिंग आणि त्यासोबतच ‘नाफा’ची निर्मिती असलेल्या तीन शॉर्टफिल्म्सही दाखवण्यात आल्या. सोबत सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि वैदेही परशुरामी यांच्यासाठी खास ‘मीट अँड ग्रीट’ आयोजित करण्यात आलं होतं, ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वर्कशॉप्सच्या माध्यमातून प्रेक्षकांना आणि कलाकारांना थेट संवादाची संधी मिळाली. अश्विनी भावे, अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित सत्रं घेतली, तर प्रसाद फणसे आणि रोहन फणसे यांनी डबिंगसंदर्भात खास वर्कशॉप घेतलं, जे सहभागींसाठी अतिशय माहितीपूर्ण ठरलं. विशेष म्हणजे अमोल पालेकर यांचं आत्मचरित्र ‘ऐवज’आणि त्याचं इंग्रजी भाषांतर ‘Viewfinder’ यांचं अमेरिकेतील प्रकाशन नाफाच्या मंचावर पार पडलं. प्रकाशनानंतर विक्रम वाटवे यांनी अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीसाठी अमेरिकेचा क्रिकेटपटू सौरभ नेत्रावळकर खास उपस्थित होता.

‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली एका खास सन्मानाने, अमेरिकेच्या संसदेने ‘नाफा’ला दिलेलं मानपत्र, श्री ठाणेदार यांनी ‘नाफा’च्या मंचावर अभिजीत घोलप यांना प्रदान केलं. यानंतर तीन नव्या शॉर्टफिल्म्सचं स्क्रीनिंग पार पडलं आणि आदल्या दिवशी दाखवलेल्या तीन शॉर्टफिल्म्सचे दिग्दर्शक श्रीमिरजकर (योगायोग), हर्ष महाडेश्वर(सबमिशन), संदीप करंजकर(द गर्ल विथ रेड हॅट) यांच्यासोबत डॉ. गौरी घोलप यांनी संवाद साधला. त्यानंतर बेस्ट शॉर्टफिल्म(डम्पयार्ड), दुर्वा नांदापूरकर(बेस्ट स्क्रीन प्ले – भंगी), भूषण पाल( बेस्ट सिनेमॅटोग्राफी – डम्पयार्ड) रुचिर कुलकर्णी( बेस्ट एडिटिंग – चेंजिंग रूम), प्रफुल्ला खारकर (विशेष उल्लेखनीय – बिर्याणी), गार्गी खोडे(विशेष उल्लेखनीय – सबमिशन) या स्टुडंट सपोर्टींग विभागातील शॉर्ट फिल्म्सना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

त्यानंतर अनिल भालेराव दिग्दर्शित छबिला आणि निखिल महाजन दिग्दर्शित ‘रावसाहेब’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग झालं. सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी, सचिन खेडेकर, डॉ. मोहन आगाशे यांचे मास्टरक्लासेसला रसिक प्रेक्षकांनी सखोल दाद दिली. यानंतर झालेल्या पॅनल डिस्कशनमध्ये मराठी सिनेमा – वर्तमान, भवितव्य आणि वाटचाल या विषयावर मधुर भांडारकर, अवधूत गुप्ते, डॉ. मोहन आगाशे, गजेंद्र अहिरे, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी , आदिनाथ कोठारे यांनी आपली मतं मांडली या पॅनल डिस्कशनचे सूत्रसंचालन वैदेही परशुरामी हिने केले. क्लोजिंग सेरेमनीच्यावेळी नाफा अध्यक्ष अभिजीत घोलप, अर्चना सराफ, रिया ठोसर, अनुप निमकर, लक्ष्मण आपटे, वृषाली मालपेकर, मानसी देवळेकर आणि इतर सर्व नाफा सदस्यांनी प्रेक्षकांशी हितगुज केले. अभिजीत घोलप यांनी पुढील वर्षीच्या NAFA नाफामध्ये काय नवं असेल, कोणते नवे देश गाठायचे आहेत, आणि या उपक्रमाचं पुढचं पाऊल काय असावं, याविषयी माहिती दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *